Government officer arrested for taking a bribe in PMAY scheme
चंद्रपूर: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई २५ फेब्रुवारी रोजी सावली तालुक्यातील लोंढोली गावात करण्यात आली.
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले होते. एकूण १.२० लाख रुपये अनुदानापैकी १५ हजार रुपयांचा पहिला हफ्ता प्राप्त झाला होता. लाभार्थ्याचा मुलगा आणि तक्रारदार स्वतः या घरकुलाचे काम पाहत होते. याच घरकुलाच्या दुसऱ्या हफ्त्याच्या ७० हजार रुपयांच्या मंजुरीसाठी ग्रामसेवक चंद्रशेखर केशव रामटेके यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीत तडजोडीनंतर ग्रामसेवकाने आधी १० हजार आणि उर्वरित १० हजार नंतर घेण्याची तयारी दर्शविली. २५ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष ग्रामसेवक रामटेके यांनी १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले.
ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके यांच्याविरुद्ध सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत नरेशकुमार नन्नावरे, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे व संदीप कौरासे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
नागरिकांना लाचलुचपत विभागाचे आवाहन
चंद्रपूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की,
कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास 07172-250251 या क्रमांकावर किंवा टोल-फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.
